इंदापूर प्रतिनिधी : श्री. महादेव चव्हाण
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठांनी परस्परांमध्ये मैत्रीभाव जपत जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, असा मोलाचा संदेश प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक बाबासाहेब घाडगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉ. एम. के. इनामदार यांचा शाल व ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. इनामदार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना वाढत्या वयात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन कसे समृद्ध करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते क्षेत्रातील ५ वयोवृद्ध सिनीयर ज्येष्ठ नागरिकांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्रीमती प्रतिभाताई गारटकर, श्री. रघुनाथ खरवडे, श्री. मुक्ताजी कांबळे, श्री. सुधाकर पाणबुडे आणि श्रीमती अंजना सामसे या ज्येष्ठांचा समावेश होता. पुरस्कार प्राप्त झालेल्या या सर्व मान्यवरांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
याप्रसंगी आयोजित मनोगताच्या सत्रात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार व अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमात कवी पुष्पराज जमदाडे यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व सांगणारी एक सुंदर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या सर्व सादरीकरणामुळे कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थोरात, सचिव हनुमंत शिंदे, माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, भानुदास पवार, पांडुरंग जगताप, ह.भ.प. भाऊसाहेब खबाले महाराज, डॉ. उदय अजोतीकर, अशोक गानबोटे, बाळकृष्ण क्षिरसागर, जवाहर बोरा, प्रमोद भंडारी, सुभाष महाजन, संचालक हमीदभाई आतार, लेखक महादेव चव्हाण आणि सहल प्रमुख भारत बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सौ. छाया जाधव, सहसचिव रामभाऊ जगताप, हनुमंत बोंगाणे, भगवान पाटील, दत्तात्रेय चांदणे आणि ज्ञानेश्वर सांळुके यांच्यासह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने व सहकार्याने हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
