इंदापूर (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर बसस्थानक परिसर येथे विविध संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसेवादल, एसटी आगार आणि नागरी संघर्ष समिती इंदापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेला अत्यंत आदराने पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रा. कृष्णा ताटे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या महान कार्याचा गौरव केला. महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी विचारांची ताकद सांगताना ते म्हणाले की, गांधीजींनी हातात कोणतेही शस्त्र न घेता केवळ सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ऐतिहासिक आंदोलन उभारले. त्यांच्या याच अहिंसक लढ्यामुळे देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी रक्तविहीन स्वातंत्र्य मिळाले. तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, शास्त्रीजींनी 'जय जवान, जय किसान' ही अजरामर घोषणा देऊन देशातील शेती विकासाला गती दिली. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात विजय मिळवून देत त्यांनी संपूर्ण जगात भारत देशाची मान उंचावली.
याप्रसंगी इंदापूर एसटी आगाराचे व्यवस्थापक आदरणीय हनुमंत गोसावी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजी यांच्या विचारांची गरज आज संपूर्ण देशाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या दोन्ही राष्ट्रपुरुषांचे उदात्त विचार आणि जीवनमूल्येच आज संपूर्ण जगाला कठीण परिस्थितीतून तारतील आणि शांततेचा मार्ग दाखवतील, असा विश्वास गोसावी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
या अभिवादन सभेला स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांच्यासह एसटी आगाराचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रसेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश आबा शिंदे आणि महाराष्ट्र संघटक गफूरभाई सय्यद यांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लावून अभिवादन केले.
या कार्यक्रमास इंदापूर संघर्ष समितीचे मार्गदर्शक हमीदभाई अत्तार, महादेव चव्हाण, हनुमंत बोंगाणे, भारत बोराटे, विक्रम चंदनशिवे, विजय नवगिरे, गजानन पवार यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर, नागरिक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत या कार्यक्रमाची सांगता केली.
