अग्रलेख : जेव्हा समाजाचे मार्गदर्शकच वाटेवरून घसरतात...
शिक्षक हा समाजाचा आदर्श असतो, विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतात. मग शिक्षक असे वागत असतील तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय? हा संतप्त आणि तितकाच रास्त सवाल सध्या इंदापूरच्या पालक आणि सुजाण नागरिकांमधून विचारला जात आहे. ज्यांच्या हातामध्ये देशाच्या भावी पिढीला घडवण्याची, त्यांना सुसंस्कारित करण्याची जबाबदारी आहे, त्याच गुरुजींनी भरसभेत घातलेला राडा पाहून संपूर्ण तालुक्याची मान शरमेने खाली गेली आहे. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या १०३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जो अभद्र प्रकार घडला, तो केवळ सभेपुरता मर्यादित नसून, शिक्षक या पवित्र पेशाला डाग लावणारा ठरणारा आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे संस्थेच्या वर्षभराच्या कारभाराचा ताळेबंद मांडण्याचे आणि त्यावर लोकशाही मार्गाने चर्चा करण्याचे हक्काचे व्यासपीठ. लोकशाही पद्धतीने सभा होणे आवश्यक असताना हुकूमशाही का? इंदापूरच्या या सभेत १२.०५ टक्के लाभांश मंजूर झाला, ही आर्थिक दृष्टीने समाधानाची बाब असली तरी, त्या बदल्यात तिथे झालेल्या नैतिकतेच्या घसरणीचे काय? अहवालातील त्रुटींवरून सभासदांनी जाब विचारणे हा त्यांचा हक्क आहे. त्याला तितक्याच संयमाने आणि पुराव्यानिशी उत्तर देणे अपेक्षित असते. परंतु, विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी जर थेट अंगावर धावून जाण्याची भाषा आणि कृती होत असेल, तर याला 'शिक्षकी पेशा' म्हणावा का, हाच मोठा प्रश्न आहे.
संस्कारांचे धडे देणाऱ्यांचेच वर्तन बेभरोशाचे?
या संपूर्ण प्रकारातील अत्यंत खेदजनक आणि संतापजनक बाब म्हणजे, आपल्याच सहकाऱ्याने प्रशासकीय किंवा आर्थिक त्रुटींवर बोट ठेवल्यानंतर, इतर संचालकांनी त्यांच्यावर धावून जाणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. समाज ज्या शिक्षकांकडे सहानुभूती, संवेदनशीलता आणि नैतिकतेचे प्रतीक म्हणून पाहतो, त्यांच्यातच जर सहकाऱ्याबद्दल किमान आदर आणि संवेदनशीलता नसेल, तर त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना कोणते सामाजिक संस्कार शिकवावे? केवळ सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही, म्हणून या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय?
आजचा विद्यार्थी हा अत्यंत सजग आहे. सभोवतालच्या घडामोडींचे तो सूक्ष्म निरीक्षण करत असतो. वर्गखोलीत शांतता, शिस्त आणि लोकशाही मूल्यांचे धडे देणारे शिक्षक जेव्हा स्वतःच्या सहकाऱ्यांवर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक रूप धारण करतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होत असेल? 'गुरूने जे सांगितले ते करावे, गुरू करतो ते करू नये' ही म्हण आता उरलेली नाही; कारण मुले ही शिक्षकांच्या कृतीचे अनुकरण करत असतात. जर आदर्शच हिंसक होऊ लागले, तर उद्याच्या सुजाण नागरिकांची फळी आपण कशी निर्माण करणार?
आत्मपरीक्षणाची गरज
शिक्षकांच्या पतसंस्था या आर्थिक उलाढालींची केंद्र बनली आहेत. पैसा आला की तिथे राजकारण आणि अहमपणा येतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परंतु, शिक्षकांनी हे विसरू नये की ते आधी एक 'शिक्षक' आहेत आणि नंतर कोणत्याही पतसंस्थेचे संचालक किंवा सभासद. व्यावसायिक राजकारण्यांप्रमाणे जर शिक्षकही भरसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणार असतील, तर त्यांच्यात आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांमध्ये काय फरक उरला?
इंदापूर तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे केवळ पतसंस्थेची नाचक्की झालेली नाही, तर सर्वसामान्य जनतेचा शिक्षकांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. सोशल मिडिया वरील पोस्टवर जनतेने केलेल्या कमेंट अक्षरशः न वाचण्यासारख्याच आहेत. तालुक्यातील पालक आणि नागरिकांमधून व्यक्त होणारी नाराजी ही अगदी योग्य आहे. या घटनेनंतर आता केवळ दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही, तर या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी शिक्षक समाजानेच एकत्र येऊन अशा हुकूमशाही आणि हिंसक वृत्तीचा निषेध केला पाहिजे. 'गुरुजीं'चा हा राडा समाजाला आणि पुढच्या पिढीला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल का ? असा प्रश्न उपस्थित होते साहजिकच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, संबंधित अधिकारी, शिक्षक वर्गाने यावर गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

