इंदापूर : दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने सेंद्रिय शेती, शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर आणि शेतमालाचे प्रोसेसिंग या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विशेष चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई आणि खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र पार पडले. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियेच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या चर्चासत्रासाठी पुणे विद्यापीठाच्या 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क'चे संस्थापक संचालक श्री. अशोक सराफ तसेच कार्यक्रमास प्रसिद्ध फळ उद्योग शेतकरी व मार्गदर्शक श्री. सिद्धेश्वर थोरात, डॉ. गणेश राखुंडे आणि श्री. आदित्य राखुंडे, फर्ग्युसन महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यक समितीचे विद्यार्थी श्री. अथर्व डोके यांची विशेष उपस्थिती लाभली. सध्या श्री. अशोक सराफ आणि अथर्व डोके हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. याप्रसंगी बोलताना श्री. अशोक सराफ यांनी शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा योग्य आणि प्रभावी वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कमीत कमी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर त्यांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला मालावर स्वतः प्रक्रिया उद्योग चालू केल्यास उत्तम प्रकारे अर्थार्जन करता येईल. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ, प्रोसेसिंगच्या नियमावली आणि विर्क्री प्रक्रिया यावर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी यांच्या समोरील आव्ह्याने, प्रशिक्षण तसेच यंत्र सामग्री कशी उपलब्ध करून देता येईल आणि या मध्ये संस्था कोणकोणती मदत करू शकेल याबाबत नियोजन करण्यात आले.
संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर सर यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, तो टिकला तर देश टिकेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाची पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न संस्था करेल असे सांगितले. श्री. सिद्धेश्वर थोरात यांनी शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या मालाचे प्रोसेसिंग (प्रक्रिया) करून विक्री केल्यास कसा अधिक नफा मिळू शकतो, याविषयी आपले विचार व्यक्त केले. इंदापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच शेतमाल प्रोसेसिंग युनिट्स उभारून स्वतःचे आर्थिक सबलीकरण कसे करावे, यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तर डॉ. गणेश राखुंडे यांनी शेतकरी स्वावलंबी बनावा म्हणून शेती सोबत छोटे उद्योग सुरु करणे महत्वाचे आहे असे सांगितले.
चर्चासत्रात स्व. शंकरराव पाटील उर्फ भाऊ यांच्या ऐतिहासिक योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला. भाऊंनी इंदापूर तालुक्यात सहकार तत्त्वावर साखर कारखाना सुरू करून ऊस लागवडीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचा कायापालट व विकास घडवून आणला होता. त्याच वैचारिक अनुषंगाने, आजच्या काळात शेतकऱ्यांनी केवळ कच्च्या मालावर अवलंबून न राहता त्यांनी पिकवलेल्या फळांचे व पिकांचे प्रोसेसिंग करून आपली आर्थिक बाजू मजबूत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या या आर्थिक उन्नतीसाठी आणि प्रोसेसिंग युनिट्सच्या उभारणीसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पाठीशी राहील, तसेच आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि मदत करेल, असा ठाम संकल्प याप्रसंगी संस्थेच्या वतीने करण्यात आला. सेंद्रिय शेतीची कास धरत AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास इंदापूरचा शेतकरी जगभरात स्पर्धा करू शकेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवर व विचारवंतांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण चर्चासत्राच्या संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, इन्चार्ज श्री. दिपक जगताप कर्मचारी सागर कांबळे, अमोल राऊत आणि केदार गोसावी उपस्थित होते.

