मोशी : प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षण सत्रासाठी महानगरपालिकेच्या प्रशिक्षिका श्रीमती उषा वानरे उपस्थित होत्या.
त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.सत्रादरम्यान परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे यावर विशेष भर देण्यात आला.प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारणे याबाबतही माहिती देण्यात आली.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.विद्यार्थ्यांनी आपल्या घरापासून, वर्गखोलीपासून आणि शालेय परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले.
स्वच्छतेच्या माध्यमातून रोगराई रोखणे आणि पर्यावरण संतुलित राखणे शक्य असल्याचे प्रशिक्षिका श्रीमती उषा वानरे यांनी स्पष्ट केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.स्वच्छ भारत अभियानाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रशिक्षण सत्रांचे महत्त्व अधोरेखित झाले.
प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या या उपक्रमातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी भारत घडविण्याच्या राष्ट्रीय अभियानाला हातभार लावण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षिका यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले.
