हा विशेष पुरस्कार सोहळा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) आणि आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. ॲड. नाझेर काझी आणि प्रसिद्ध सिने कलावंत मा. सुयोग गोऱ्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. दत्तात्रय जाधवर, ॲड. नागेश सोनूने, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील, डॉ. सतीश कराळे, डॉ. दिशा चव्हाण, डॉ. अभिजीत कवटकर आणि डॉ. प्रशांत सावंत उपस्थित होते. तसेच डॉ. धीरज मेश्राम, डॉ. विनोद ढोबळे, सौ. स्मिता खारकर, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, सारंग फुके यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक ॲक्युपंक्चरिस्ट आणि थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुवर्णा पाटील यांनी मागील अनेक वर्षांपासून ॲक्युपंक्चर थेरपीच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू ठेवली असून, या उपचार पद्धतीचा समाजात प्रचार आणि प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच निरंतर आणि उल्लेखनीय आरोग्यसेवेची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार प्रदान करणारी 'आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन' ही भारतातील एक नामांकित आणि मोठी संस्था आहे. ही संस्था आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर आणि निसर्गोपचार अशा सात महत्त्वाच्या चिकित्सा पद्धतींना एकत्रित घेऊन वैद्यकीय क्षेत्रात देशपातळीवर व्यापक कार्य करत आहे.
या दिमाखदार सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन योगाचार्य विजय नवल पाटील, श्री. तुषार वाघूळदे आणि महिका खारकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. दरम्यान, डॉ. सुवर्णा पाटील यांना हा मानाचा 'महा ॲक्युपंक्चर रत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापूर शहर, परिसरातील नागरिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मित्रपरिवाराकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.
