इंदापूर: गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भीमा खोऱ्यातील धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रचंड वाढली असून, धरणाने आज एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. धरणातील पाणीसाठा आता उणे (मायनस) मधून अधिक (प्लस) मध्ये आला आहे.
मृत साठा पूर्ण भरला
चालू उन्हाळ्यात कडक ऊन आणि वाढत्या वापरामुळे उजनी धरणातील पाणीपातळी खालावली होती आणि धरण उणे (मृत साठ्यात) गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत घाटमाथ्यावर आणि पुणे परिसरात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे धरणात गतीने पाणी जमा झाले. आज धरणाचा संपूर्ण मृत साठा (Dead Storage) भरून काढत पाणीसाठा अधिक (Live Storage) मध्ये आला आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्याची पाणीपातळी आणि उपयुक्त साठा
ताज्या अहवालानुसार, उजनी धरणात सद्यस्थितीला ६६.२८ टीएमसी (TMC) एकूण पाणीसाठा झाला आहे. मृत साठ्याची ६३.६५ टीएमसीची पातळी ओलांडून पाणी आता उपयुक्त साठ्याकडे सरकले आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणात येणारी आवक पुढील काही दिवस अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
उजनी धरण 'प्लस'मध्ये आल्याची बातमी समजताच इंदापूर, करमाळा, माढा आणि पंढरपूर यांसह संपूर्ण लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून नागरिकांची काही अंशी सुटका झाली आहे.
