इंदापूर तालुका प्रतिनिधी: गणेश धनवडे
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामस्थ आणि स्वामीभक्तांच्या उपस्थितीत यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिमय आणि अति उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि श्री दत्त मंदिर परिसरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री दत्त मंदिरातून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची आणि पालखीची गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण निमसाखर नगरी स्वामी नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. स्वामीभक्त महिलांनी पालखीच्या मार्गावर अत्यंत देखण्या आणि आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे आणि श्रींच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत केले.
ग्रामप्रदक्षिणेनंतर पालखी श्री दत्त मंदिरात आल्यावर ह.भ.प. श्री माऊली महाराज जाधव (शेळगाव) यांचे श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आणि संतांच्या महतीवर आधारित भावपूर्ण प्रवचन झाले. प्रवचनानंतर उपस्थित सर्व भक्तांनी एकत्र येत श्रींचा सामूहिक नामजप आणि महाआरती केली.
धार्मिक विधी आणि आरती संपन्न झाल्यानंतर सर्व स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद श्री किसन बापूराव शेळके यांच्या वतीने देण्यात आला.या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर आणि पालखीची सजावट अत्यंत आकर्षक करण्यात आली होती. श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी श्रींच्या पालखीची सुंदर सजावट केली होती, तर मंदिराच्या आवारात काढण्यात आलेल्या नयनरम्य आणि सुंदर रांगोळीचे नियोजन सौ. शितल सुनील टकले यांनी केले होते.
या संपूर्ण धार्मिक सोहळ्यास निमसाखर आणि परिसरातील सर्व स्वामीभक्त, नागरिक, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
