इंदापूर: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री संत निळोबा महाराज यांचा पालखी सोहळा आज काही वेळातच इंदापूर शहरात दाखल होत आहे. काल (शुक्रवारी) लोणी देवकर येथे मुक्काम केल्यानंतर, आज सकाळी या पालखी सोहळ्याने इंदापूरच्या दिशेने प्रस्थान केले. मात्र, इंदापूर शहराच्या प्रवेशद्वारावरच वारकऱ्यांना आणि प्रशासनाला समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्व्हिस रोडवर बेशिस्त वाहनांचे साम्राज्य
पुण्याकडून इंदापूर शहरात प्रवेश करताना बाह्यवळणावरून (बायपास) शहरात जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सध्या वाहनांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक ट्रक आणि गॅसचे टँकर अत्यंत बेशिस्तपणे उभे करण्यात आले आहेत. दररोजची ही समस्या आज पालखी सोहळ्याच्या दिवशी अधिक गंभीर बनली असून, संपूर्ण सर्व्हिस रोड वाहनांच्या विळख्यात अडकला आहे.
सर्व्हिस रस्ता असताना मुख्य हायवेवरून पालखी आणायची वेळ?
सर्व्हिस रोडवर चालण्याइतकीही जागा शिल्लक नसल्यामुळे, संत निळोबा महाराजांची पालखी आणि हजारो वारकरी यांना इंदापूर शहरात येताना पर्यायाने मुख्य हायवेवरून (राष्ट्रीय महामार्ग) यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी
पालखी सोहळा काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार असल्याने सद्यस्थितीला प्रशासनाने यावर त्वरित लक्ष घालणे गरजेचे आहे. या मार्गावर बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे उभे असलेले मालवाहतूक ट्रक व गॅसचे टँकर तात्काळ बाजूला काढण्यात यावेत, अशी मागणी वारकरी आणि इंदापूरकरांमधून जोर धरत आहे.

