इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री सिद्धीदाता त्वचा व सौंदर्य क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'त्वचेचे संरक्षण आणि सौंदर्याला चालना' या विशेष मोफत कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेला इंदापूर परिसरातील नागरिक, तरुण-तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उदंड प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. अरविंद गारटकर यांनी ट्रस्टतर्फे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. बदलती जीवनशैली, वेगाने बदलणारे हवामान आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असून अशा काळात त्वचेची योग्य ती काळजी घेणे कसे अत्यंत गरजेचे बनले आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात विशेष भर दिला.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले नामवंत त्वचा, केस व सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अवधूत विठ्ठल खबाले (एम.डी. मेडिसिन, डर्मेटोलॉजी, कॉस्मेटोलॉजी व ट्रायकोलॉजी पदविका) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निरोगी व सुंदर त्वचेसाठी दैनंदिन जीवनात स्वच्छता, ओलावा टिकवणे, उन्हापासून संरक्षण आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण या चार सुवर्णनियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.
तसेच चेहऱ्यावरील अॅक्ने अर्थात पिंपल्सच्या समस्येवर बोलताना डॉ. खबाले यांनी सांगितले की, अतिरिक्त तेलनिर्मिती, बॅक्टेरियाचा संसर्ग, बंद छिद्रे, संप्रेरकांमधील बदल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर यांमुळे पिंपल्स होतात. पिंपल्स फोडल्यास त्वचेवर कायमचे डाग पडू शकतात, त्यामुळे स्वतःहून कोणतेही प्रयोग न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर, सौ. अश्विनी गारटकर, डॉ. खबाले यांच्या मातोश्री ॲड. जयश्री खबाले, श्री. आदित्य राखुंडे, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, कर्मचारी सागर कांबळे, अमोल राऊत, केदार गोसावी व स्वाती कोल्हे उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनातील त्वचा व सौंदर्याविषयक विविध शंकांचे निरसन करून घेतले आणि शेवटी आभार प्रदर्शनाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

