इंदापूर: महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष समितीच्या वतीने विविध न्याय्य मागण्यांसाठी उभारण्यात आलेल्या मच्छीमार आंदोलनाला आता ‘इंदापूर तालुका संघर्ष समिती’ने जाहीर पाठिंबा दिला आहे. स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या धोरणांविरोधात संपूर्ण इंदापूर तालुका आता आक्रमक झाला असून, या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पळसदेव येथे व्यापक जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक भूमिपुत्र मच्छीमारांच्या हक्कांवर डल्ला मारणारे निर्णय त्वरित मागे घेण्यात यावेत, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. यामध्ये मच्छीमारीचा अन्यायकारक ठेका त्वरित रद्द करणे, निविदा प्रक्रिया थांबवणे आणि स्थानिक मच्छीमारांना त्यांच्या हक्काचा अधिकृत अधिकार देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच धरणाच्या पाण्यावर आणि जमिनींवर बळजबरीने राबवले जाणारे सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ थांबवून विस्थापित शेतकरी व मच्छीमारांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी जोरदार मागणी समितीने लावून धरली आहे.
"आता जगून तरी करायचे काय?" हा केवळ प्रश्न नसून भूमिपुत्रांचा आक्रोश आहे, अशा तीव्र भावना आंदोलकांकडून व्यक्त होत आहेत. प्रशासकीय उदासीनता आणि भांडवलदारांच्या धोरणांमुळे आपल्याच बांधवांवर जलसमाधी घेण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची टीका संघर्ष समितीने केली आहे. "आता नाही सहन करणार, हक्कासाठी लढणार" आणि "मच्छीमार एकता जिंदाबाद" अशा घोषणा देत मच्छीमारांनी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.
हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता पळसदेव येथील उजनी धरण परिसरात हे 'जलसमाधी आंदोलन' पार पडणार आहे. भांडवलदारांच्या विरोधात आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या सरकारच्या धोरणांविरोधात एकजुटीने लढा देऊन आपले हक्क मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका संघर्ष समितीने तालुक्यातील सर्व नागरिक, विविध पक्ष, सामाजिक संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रही आवाहन केले आहे. "चलो पळसदेव"ची हाक देत या जलसमाधी आंदोलनाला सर्व स्तरांतून अभूतपूर्व पाठिंबा दर्शवून मच्छीमार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.
