कळंब वालचंदनगर : विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता आणि चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर २०२६) 'एक्सप्लोरिंग अविष्कार कम्पिटिशन २०२६-२७' (Exploring Avishkar Competition 2026-27) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील एआरसी (ARC) कमिटी व आयक्यूएसी (IQAC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, प्रथम सत्राचे मार्गदर्शक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (बारामती) येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अजित तेलवे, दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर) येथील उपप्राचार्य तथा भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी वीर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, प्रा. डॉ. प्रशांत शिंदे तसेच एआरसी (ARC) समन्वयक डॉ. विलास बुवा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विलास बुवा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेचे स्वरूप, संशोधन प्रकल्पाची निवड, संशोधन पद्धती, प्रकल्प सादरीकरण आणि स्पर्धेतील विविध टप्प्यांविषयी सखोल माहिती मिळावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे केवळ एक स्पर्धा म्हणून न पाहता, समाजातील विविध समस्या ओळखून त्यावर अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अजित तेलवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अविष्कार स्पर्धेची संकल्पना, स्पर्धेचे विविध स्तर, संशोधन विषयाची निवड, मांडणी आणि प्रकल्प सादरीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, कृषी, तंत्रज्ञानविषयक तसेच शैक्षणिक समस्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यातून संशोधन विषय विकसित करावा, असा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय संशोधनातील नाविन्य, वस्तुनिष्ठता, तथ्याधारित मांडणी व शास्त्रीय दृष्टिकोन याचे महत्त्व त्यांनी विषद केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. शिवाजी वीर यांनी संशोधन प्रकल्पाची प्रभावी मांडणी, संशोधन पद्धती, माहिती संकलन, विश्लेषण, निष्कर्ष आणि सादरीकरण या तांत्रिक घटकांवर मार्गदर्शन केले. केवळ माहिती गोळा न करता तिचे शास्त्रीय विश्लेषण करून अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे कसे आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्प सादरीकरणाच्या वेळी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विषयाचे सखोल ज्ञान, वेळेचे नियोजन आणि परीक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याची क्षमता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे मार्गदर्शकांनी निरसन केले. संपूर्ण कार्यशाळेला महाविद्यालयातील २८ प्राध्यापक आणि ५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन साळवे यांनी केले, तर शेवटी डॉ. रामचंद्र पाखरे यांनी सर्वांचे आभार मानले.
