इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे):
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग इंग्लिश मीडियम स्कूल (कळंब, ता. इंदापूर) येथे गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या बालचमूंनी उपस्थित आजी-आजोबांचे केलेले विधिवत पाद्यपूजन! लहान मुलांनी आजी-आजोबांच्या चरणावर श्रद्धापूर्वक लीन होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या आणि भावूक उपक्रमामुळे उपस्थित सर्वांचेच मन भारावून गेले. या वेळी विद्यार्थ्यांनी गुरू, पालक आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा संदेश देणारी गीते, प्रार्थना आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली.
कार्यक्रमा दरम्यान विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "गुरू हा ज्ञानाचा दीप असून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा सच्चा मार्गदर्शक असतो. केवळ शिक्षकच नव्हे, तर आपले आई-वडील आणि आजी-आजोबा हेदेखील आपल्या जीवनातील पहिले गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि विचारांचा आदर करून संस्कारमय जीवन जगणे, हीच खरी गुरुदक्षिणा आहे."
या सोहळ्याला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, शिक्षिका अश्विनी घुगरी, सुजाता निंबाळकर, प्राजक्ता अर्जुन यांच्यासह शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

