इंदापूर (प्रतिनिधी: गणेश धनवडे)
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे स्वर्गीय संस्थापक-अध्यक्ष विश्वासराव (दादा) रणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘विश्वास गौरव–२०२६’ पुरस्कार यंदा भारतीय सैन्यदलातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले (सेना मेडल) यांना प्रदान करण्यात आला.
कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. संरक्षण क्षेत्रातील भोसले यांच्या ३४ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त राही रणसिंग, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, मुख्याध्यापक महादेव बागल, मुख्याध्यापक बाळू कदम, माजी सैनिक भगवान वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रणसिंग उपस्थित होते. तसेच सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन भोसले यांच्या आई पार्वती भोसले, बंधू मनोज भोसले, पत्नी वंदना भोसले, मुलगा शिवतेज व मुलगी वैष्णवी भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट करताना संस्था सचिव विरसिंह रणसिंग म्हणाले, "स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, शैक्षणिक, संरक्षण, कृषी यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी ‘विश्वास गौरव’ पुरस्काराने सन्मान केला जातो. समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे. यंदा सेवा, शिस्त, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या संरक्षण क्षेत्रातील सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन जयपाल भोसले यांना हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे."
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना जयपाल भोसले यांनी सैन्यदलातील आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकाळातील अनेक प्रेरणादायी अनुभव, शौर्य आणि साहसाच्या आठवणी उपस्थितांसमोर उलगडल्या. "देशसेवा ही केवळ नोकरी नसून राष्ट्राप्रती असलेली सर्वोच्च जबाबदारी आहे. युवकांनी शिस्त, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा जोपासून राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान द्यावे," असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या सन्मान सोहळ्याला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (निवेदन) अभिजीत शिंगाडे यांनी केले, तर आभार डॉ. प्रशांत शिंदे यांनी मानले. तसेच संस्था संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कळंब), माध्यमिक विद्यालय (तावशी) आणि माध्यमिक विद्यालय (म्हसोबाचीवाडी) येथे जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व वृक्षरोपण कार्यक्रम उत्साहात पार पडले.

