इंदापूर, डॉ. संदेश शहा
पर्यावरण संतुलन व संरक्षण, हवामान बदलाशी प्रभावी मुकाबला आणि भविष्यात कार्बन क्रेडिटद्वारे आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दूरदृष्टीने इंदापूर नगरपरिषदेने ऐतिहासिक निर्णय घेतला असून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘कार्बन क्रेडिट सिटी, इंदापूर’ या ऐतिहासिक, महत्त्वाकांक्षी संकल्पनेला एकमताने मंजुरी देण्यात आली. याबरोबर शहराची कार्बन इन्व्हेंटरी आणि ग्रीन ॲसेट रजिस्टर तयार करण्यासही सभेने हिरवा कंदील दाखविला. एक अभंग, एक झाड ही अभिनव संकल्पना देखील राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच हरित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणारा हा निर्णय इंदापूर शहराच्या विकास व इतिहासात ऐतिहासिक ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. या संकल्पनेसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सत्ताधारी गट नेते शकिलभाई सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी यांचे सहकार्य मिळत असून सर्व इंदापूरकर देखील या अभिनव उपक्रमात आपले अनमोल योगदान देतील असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध देश, उद्योग आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या किंवा उत्सर्जन कमी करणाऱ्या शहरांना व संस्थांना कार्बन क्रेडिट मिळते. या कार्बन क्रेडिटच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होत असल्याने इंदापूर नगरपरिषदेने या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी सांगीतले.
भरत शहा पुढे म्हणाले, इंदापूर नगरपरिषदेने गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक विकासाची भक्कम पायाभरणी केली आहे. माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात शहरातील सर्व स्ट्रीटलाईट्स शंभर टक्के एलईडी करण्यात आले. सार्वजनिक प्रकाशयोजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्यात आला. कचऱ्यापासून खत व ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले. शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसविण्यात आला. भूमिगत सांडपाणी व्यवस्थेची उभारणी करण्यात आली तसेच जैवविविधता उद्यानाची निर्मिती करून विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वीस गुंठे जागेत सुमारे २,२०० देशी वृक्षांचे अटलघन वन विकसित करण्यात आले असून, दहा गुंठे जागेत सुमारे १,५०० वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. शहा नर्सरी यांच्या सहकार्याने शहरभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमुळे शहराची हरित संपत्ती वाढली असून भविष्यात कार्बन क्रेडिट निर्मितीसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेले संकल्प प्रतिष्ठान, उमंग प्रतिष्ठान, वृक्ष संजीवनी परिवार आणि रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांसह विविध सामाजिक संस्था शहराच्या हरित विकासात अनमोल योगदान देत आहेत. भविष्यात नागरिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक वाढवून ‘ग्रीन कार्बन सिटी- इंदापूर’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करण्यात येत आहेत.
भरत शहा पुढे म्हणाले, “आजपर्यंत करण्यात आलेल्या सुमारे ६५ ते ७० टक्के पर्यावरणीय कामांचा उद्देश भविष्यातील कार्बन क्रेडिट व्यवस्थेचा विचार करूनच करण्यात आला. आता कार्बन इन्व्हेंटरी आणि ग्रीन ॲसेट रजिस्टर तयार करून इंदापूरला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन कार्बन सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. या सभेत संत तुकाराम महाराज अभंग तपोवन उभारण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या ४,५८३ अभंगांपासून प्रेरणा घेत ‘एक अभंग - एक झाड’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकासाचा संगम साधण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे. पर्यावरण संरक्षण, हरित अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक स्वावलंबन या चारही घटकांचा समन्वय साधणारा हा निर्णय इंदापूरला राज्यातील आदर्श हरित शहर म्हणून नवी ओळख मिळवून देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
