इंदापूर, डॉ. संदेश शहा
लाखो शेतकऱ्यांची पदयात्रा काढून मुंबई येथे धडक देणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेने महाराष्ट्र शासनाकडे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे चर्चा करून शेतकरी संबंधी व कर्जमाफी संदर्भात अनेक मागण्या सादर केल्या होत्या परंतु सदर मागण्याची योग्य दखल न घेतली गेल्यामुळे किसान सभेने कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यातील इंदापूर तहसीलदार कचेरी समोर २० ऑगस्ट पासून महा मुक्काम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
किसान सभेचे महाराष्ट्र अध्यक्ष उमेश देशमुख माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, प्रा. कृष्णा ताटे, रमेश पाटील,राजेंद्र वाटकर, संदीप अवताडे, किशोर सोनवणे, हमीद अत्तार, महादेव चव्हाण, संतोष देवकर, रुपेश पवार यांच्या सहीने नायब तहसीलदार स्वाती राऊत यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक १० ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करून ठिकठिकाणी तहसीलदार कचेरीवर निवेदन देण्यात आली. दिनांक २१ जुलै २०२६ रोजी राज्यातील पन्नास हजार हून जास्त शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढून निवेदन दिले, कृषिमंत्री व महसूल मंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर सकारात्मक भूमिका दिसली, परंतु प्रत्यक्ष शासन निर्णय होत असताना या मागण्या मंजूर केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात प्रामाणिकपणे नेहमी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात यावे, सन २००९, २०१६, २०१९ मध्ये कर्जमाफी योजनेमध्ये अनेक जाचक अटी शर्ती मुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करावा, सन २०१६ व २०१९ मध्ये पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही, त्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, कर्जमाफी मिळवत असताना शेतकऱ्यांपुढे ज्या तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात त्या दूर करा, शेतकरी कर्जमाफी होत असताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर खराब होणार नाही याची सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे.
तसेच इनाम वर्ग ३ च्या जमिनी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा, पिक विमा योजनेत केलेले शेतकरी विरोधी बदल मागे घ्या, रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, सन २००५ च्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहीर केलेली १७ हजार पाचशे रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना द्या, गायरान जमिनी कसणारे शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी करा, वरकस जमीन ताबेदाराच्या नावे करा, घराच्या तळ जमिनी व आवाराच्या जमिनी ताबेदार श्रमिकांच्या नावे करा, खते तुटवडा व लिंकेज समस्येवर तातडीने उपाययोजना करा, स्मार्ट मीटर ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध बसवू नका आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्या जर २० ऑगस्ट पर्यंत मंजूर झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातून हजारो शेतकरी इंदापूर तहसील कार्यालया समोर एकत्र येऊन महामुक्काम करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याचे सभेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
