इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर शहरातील शहा परिवाराने सामाजिक शैक्षणिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून गेले चाळीस वर्षापासून तालुक्यातील विविध शाळेतील हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यंदा शहा परिवारातील वै. श्री गोकुळदास शहा यांच्या स्मरणार्थ “विद्यार्थ्यांचा गणवेश, शिक्षणातील समतेचं प्रतीक” केंद्र बिंदू मानून वडापुरी शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मुकूंद शहा, अंगद शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेश वाटप करण्यात आले.
शहा परिवाराने गेली ४० वर्षाहून अधिक वर्षं ही अभिनव परंपरा जपली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत गणवेश देऊन शिक्षणात समानतेची भावना निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षी इंदापूर परिसरातील सुमारे ३००० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक श्री नारायणदास ( बप्पा ) शहा, श्री गोकुळदास ( भाई ) शहा, श्री सुरेशदास ( काका ) शहा यांनी या सेवा कार्याची सुरुवात केली. त्यानंतर श्री मुकुंद शहा व श्री भरत शहा यांनी ही परंपरा सुरू ठेवली. आता त्यांच्या मार्गदर्शना खाली अंगद शहा ही शहा परिवाराची तिसरी पिढी ही परंपरा पुढे चालवत असून चाळीस वर्षात हजारो, लाखो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
यंदा दादासाहेब पाटील विद्यालय, कांदलगाव, राधिका विद्यालय, इंदापूर, शिवाजी विद्यालय, अवसरी, श्रीनाथ विद्यालय, वडापुरी, मूक बधिर व मतिमंद शाळा, इंदापूर, सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, इंदापूर, तरंगवाडी विद्यालय, आश्रम शाळा, इंदापूर, कळाशी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे. काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्यासाठी देखील मदत करण्यात आली आहे. “विद्यार्थ्यांचं स्वप्न मोठं असावं, अडथळा नव्हे” – हीच शहा परिवाराची ओळख असल्याचे मुकुंद शहा यांनी सांगितले.

