इंदापूर: भैरवनाथ नगर येथील ‘क्रिएटिव्ह ॲकडमी’मध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी आणि कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे इंदापूर पंचायत समितीचे माजी विस्तार अधिकारी पुष्पराज जमदाडे साहेब यांनी स्वतः सादर केलेले देशभक्तीपर गीत होय. त्यांच्या या गायनाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक कृष्णा ताटे सर यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी आणि ध्येयप्राप्तीचे महत्त्व पटवून दिले. "ध्येय गाठण्यासाठी कष्टाची पराकाष्टा करा आणि सातत्य ठेवा," असा मोलाचा उपदेश त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना केला.
याप्रसंगी अकॅडमीचे मुख्याध्यापक हनुमंत बोंगाणे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीसोबतच शिक्षकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांची दखल घेत, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही मानधन व विशेष सत्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या वितरण सोहळ्यासाठी डॉ. पांडुरंग बोंगाणे, सुग्रीव बोंगाणे, मेजर महादेव सोमवंशी, प्रा. कृष्णा ताटे सर, हमीद भाई आतार, महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर, नाना निगोट आणि प्रशांत शेटे सर हे मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रिएटिव्ह ॲकडमीच्या संचालिका सौ. राणी रघुनाथ बोंगाणे, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. अत्यंत सुंदर आणि नेटक्या नियोजनामुळे हा स्वातंत्र्यदिन सोहळा उपस्थितांच्या आठवणीत राहणारा ठरला.

