इंदापूर, डॉ. संदेश शहा
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाची भक्ती घरोघरी पाहायला मिळते. याच भक्तीचा एक ऐतिहासिक आणि भव्य आविष्कार लवकरच शिरसटवाडीत साकारला जात आहे. गावात भगवान श्री विठ्ठलाच्या भव्य १९ फुटी मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून, या मंगलमय आणि ऐतिहासिक कार्याचा श्रीगणेशा नुकताच मूर्ती जागेचे भूमिपूजन आणि पायाभरणी सोहळ्याने झाला. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
शिरसटवाडीचे आधारस्तंभ व मार्गदर्शक, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष लालासाहेब (आबा) पवार तसेच गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी (आप्पा) शिरसट यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. उपरोक्त दोन्ही दिग्गजांच्या हस्ते विधिवत पूजा आणि मंत्रोच्चारात या १९ फुटी भव्य मूर्तीच्या चौथऱ्याची पायाभरणी संपन्न झाली. यावेळी 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' आणि 'ज्ञानबा तुकाराम'च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शिरसटवाडीत उभारण्यात येणारी ही विठ्ठलमूर्ती केवळ गावासाठीच नव्हे, तर पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक मोठे श्रद्धास्थान ठरणार आहे. १९ फूट उंचीच्या या मूर्तीमध्ये सावळ्या परब्रह्माचे लोभस आणि विलोभनीय रूप साकारले जाणार आहे. या उपक्रमामुळे गावाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात मोठी भर पडणार आहे. या पायाभरणी सोहळ्याला गावातील माजी सरपंच जयकुमार रावण, माजी उपसरपंच शेखरदादा शिरसट, ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शहाजी पवार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. आजबे सर, माजी सरपंच फिरोज पठाण, किसन शिरसट, ॲड नितीन कदम, हनुमंत कदम, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, शिरसटवाडी विकास सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, महिला वर्ग,आबालवृद्ध, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान पाहायला मिळत होते.
गावकऱ्यांच्या एकजुटीतून, अफाट श्रद्धेतून आणि लोकसहभागातून हे भव्य कार्य पूर्णत्वास जात आहे. पायाभरणीचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता मूर्तीचे काम वेगाने सुरू होणार आहे. लवकरच विठुरायाचे हे भव्य आणि विलोभनीय रूप भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध होईल, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या मंगलमय सोहळ्यामुळे संपूर्ण शिरसटवाडीत सध्या उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
