इंदापूर : इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने केलेल्या व्याज न आकारण्याच्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 150 (क) मधील तरतुदीनुसार बिले वाटप झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, असे लेखी आश्वासन नगरपालिकेने समितीला दिले आहे. त्यामुळे 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इंदापूरकरांना व्याज भरावे लागणार नाही.
याबाबत माहिती देताना संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे म्हणाले की, नगरपालिकेकडून घरपट्टी आणि पाणीपट्टीची मागणी बिले 1 एप्रिलनंतर वाटणे अपेक्षित असताना, ती थेट सप्टेंबर महिन्यात वाटण्यास सुरुवात करण्यात आली. या दरम्यान ॲड. मोरेश्वर कोकरे हे कर भरण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे दंड आणि व्याजाची मागणी करण्यात आली. हा प्रकार बेकायदेशीर असल्याची हरकत संघर्ष समितीने घेतली. या संदर्भात समितीने दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी नगरपालिकेला निवेदन देऊन, उशिरा बिले देऊन व्याज व दंडाची मागणी करणे बेकायदेशीर असून, असा प्रकार सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता.
या निवेदनाची तातडीने दखल घेत नगरपालिका प्रशासनाने हालचाली करून संघर्ष समितीला लेखी पत्र दिले. त्यात महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मधील कलम 150 (क) नुसार बिल दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 1 एप्रिल रोजी देण्यात येणारे बिल 1 सप्टेंबरनंतर देण्यात आल्याने, ज्या मालमत्ता धारकाला बिल मिळेल त्या तारखेपासून पुढील तीन महिन्यांपर्यंत व्याज आकारणी होणार नाही, अशी ग्वाही नगरपालिकेने दिली आहे.
संघर्ष समितीच्या या जागरूकतेमुळे इंदापूर शहरवासीयांचे 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंतचे व्याज वाचले आहे. या निर्णयाचे समितीने स्वागत केले आहे. तसेच समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की, 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीतील व्याज कोणीही भरू नये. घरपट्टी व पाणीपट्टीचे बिल स्वीकारताना पोचपावतीवर सहीसोबत बिल मिळाल्याची तारीख आवर्जून टाकावी, जेणेकरून नगरपालिकेला बेकायदेशीर कृती करता येणार नाही. याशिवाय बिल मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत कर भरणाऱ्याला अर्धा टक्का रिबेट मिळाला पाहिजे, या मागणीवर कायद्यातील सर्व तरतुदींचे तंतोतंत पालन केले जाईल, असे नगरपालिकेने कळवले आहे.
याप्रसंगी हमीद अत्तार, प्रा. महादेव चव्हाण, भारत बोराटे, हनुमंत बोंगाणे, नगरसेवक आशितोष गांबोटे, संदिपान कडवळे, नागनाथ उर्फ संजय शिंदे, संतोष देवकर, रुपेश सोनी, मुन्ना बागवान, गजानन पवार, अभिषेक अवघडे, लखन जगताप, वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
