इंदापूर प्रतिनिधी : श्री. महादेव चव्हाण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) दि. १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्डची सक्ती लागू केली आहे. मात्र, या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना या नव्या नियमाचा मोठा फटका बसला असून, प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर आगार व्यवस्थापकांना (डेपो मॅनेजर) एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे एसटी महामंडळाच्या अट्टहासी कारभाराचा निषेध करत, प्रवाशांची होणारी फसवणूक व आर्थिक नुकसान त्वरित थांबवण्याची मागणी समितीने केली आहे. तसेच, महामंडळाने रोख तिकीट देण्याची पारंपरिक व्यवस्था कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असा आग्रह धरण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक प्रवाशांच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये पुरेसा शिल्लक निधी (बॅलन्स) उपलब्ध आहे. तरीसुद्धा एसटी बसमधील मशीनमध्ये नेटवर्कची समस्या उद्भवल्याने ई-तिकीट निघत नाही. महामंडळाच्या किंवा डिजिटल यंत्रणेच्या या तांत्रिक त्रुटीमुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नेटवर्क नसणे हा प्रवाशांचा दोष नसतानाही त्यांना रोख स्वरूपात पूर्ण तिकीट खरेदी करावे लागत आहे.
या तांत्रिक गोंधळामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. कार्डमध्ये पैसे अडकून पडलेले असताना आणि खिशातून पुन्हा रोख पैसे मोजावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या त्रासातून सर्वसामान्य नागरिकांना आणि सवलतधारकांना त्वरित दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने केली असून, या निवेदनाची एक प्रत थेट राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडेही पाठवण्यात आली आहे.
या निवेदनावर इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी प्रा. कृष्णा ताटे, मिलिंद जोशी, हमीद अत्तार, महादेव चव्हाण आणि गजानन पवार यांच्यासह इतर सदस्यांच्या सह्या आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस तोडगा न काढल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
"प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही सध्या एक महिन्यापर्यंत रोख पैसे स्वीकारून मशीनमधून तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. वरिष्ठ पातळीवरून NCMC कार्ड सक्तीचा निर्णय आलेला असल्याने आम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागत आहे. नेटवर्कच्या तांत्रिक अडचणीबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार रोख तिकीट देण्याची ही व्यवस्था एक महिन्याऐवजी कायमस्वरूपी चालू ठेवण्याबाबत आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवू."- डेपो मॅनेजर
इंदापूर बस स्थानक येथे NCMS कार्ड रिफिल करण्यासाठी बसवलेले कर्मचारी आम्हाला यूपीआय द्वारे पैसे चालणार नाही तुम्ही रोख रक्कम आणून द्या असा तगाद लावत आहेत. सदरील कार्ड बस मध्ये दाखवल्यास तिकीट मशीन मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हे कार्ड चालत नाही तुम्ही आता तिकीटच काढा अशी वाहकाकडून मागणी पण होत आहे. हे कार्ड नक्की प्रवाशांच्या सोयीसाठी काढले आहे का प्रवाशांना त्रास देण्यासाठी काढले आहे हे समजत नाही. शासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
- प्रवासी महिला
