इंदापूर: श्रावण महिन्याचे औचित्य साधून पतंजली योग समितीच्या वतीने शहरातील विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पवित्र स्थळांवर योग साधना, ध्यान आणि भक्तीचा 'त्रिवेणी संगम' घडवून आणणारा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पवित्र श्रावणी तिसऱ्या सोमवारी, इंदापूर शहरातील कासारपट्टा येथील संत-महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि प्राचीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचा वारसा लाभलेल्या प्रसिद्ध गोसावी श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात विशेष योगसाधना वर्ग अत्यंत उत्साहात पार पडला. पहाटेचा मंद, गार वारा आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांची सकाळ मंगलमय केली.
भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने संपन्न झालेल्या या योगवर्गाचे मार्गदर्शन गुरुवर्य प्रा. श्री. भीमरावजी भोसले सर यांनी अत्यंत प्रभावी व उत्साहपूर्ण पद्धतीने केले. या वेळी झुंबा, योगाभ्यास आणि विविध प्राणायामांच्या माध्यमातून सर्व साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिमय गीतांच्या तालावर कपालभाती प्राणायाम करण्यात आला. तसेच “ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन…” या लोकप्रिय भक्तिगीताच्या सुरांवर अनुलोम-विलोम प्राणायाम करताना संपूर्ण परिसर कृष्णभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
आजच्या या योगसाधनेचे मुख्य आकर्षण आणि अंतर्मुख करणारा क्षण म्हणजे गुरुवर्य भोसले सर यांनी घेतलेले सुमारे १० मिनिटांचे 'विपश्यना ध्यानसत्र' ठरले. श्वास, शरीर आणि मन यांची जाणीव ठेवत त्यांचा सुंदर समन्वय साधत प्रत्येक साधक काही काळ स्वतःच्या अंतरंगाशी एकरूप झाला. श्वास आणि शरीराचे नाते अनुभवत स्वतःकडे पाहण्याचा हा प्रवास उपस्थितांसाठी अत्यंत शांततापूर्ण आणि आनंददायी अनुभव देणारा ठरला. या ध्यानसत्रात सर्व साधकांनी अतिशय एकाग्रतेने भाग घेतला, ज्यामुळे मंदिराचे प्रांगण योग आणि ध्यानाच्या ऊर्जेने भारून गेले.
योग वर्गाच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व योगसाधकांना भगवान श्रीकृष्णाच्या महाआरतीसाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले. मंदिरात सध्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह सुरू असताना योगवर्गाला या पवित्र सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल साधकांनी आनंद व अभिमान व्यक्त केला. उपस्थित सर्व महिला आणि पुरुष साधकांच्या शुभहस्ते भक्तिभावाने महाआरती संपन्न झाली. या प्रसंगी योगसाधना आणि ईश्वरभक्तीचा एक अद्भूत मिलाफ पाहावयास मिळाला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे गुरुवर्य श्री. अशोक नाना अनपट, गुरुवर्य हमीदभाई आतार, गुरुवर्य महादेवजी चव्हाण सर, गुरुवर्य चंद्रकांत नाना देवकर आणि गुरुवर्य प्रशांतजी गिड्डे सर यांच्यासह संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशाच प्रकारे भविष्यातही शहरातील विविध आध्यात्मिक व ऐतिहासिक ठिकाणी योगसाधना घडून यावी, अशी प्रार्थना करत "गोपाल कृष्ण भगवान की जय" च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
