इंदापूर (विशेष प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय आणि काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून धोकादायक जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) थेट उघड्यावर आणि लोकवस्तीत फेकला जात असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिथे नागरिकांना आरोग्य मिळायला हवे, तिथूनच संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयांच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे ग्रामीण भागातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
निमगाव केतकी येथील 'बारवकर वस्ती' परिसरातील मोकळ्या जागेत वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया, सिरिंज, रक्ताने माखलेले कापूस व बँडेज, तसेच औषधांचे रिकामे बॉक्स बेवारसपणे फेकून दिले जात आहेत. ज्या ठिकाणी लहान मुले खेळतात आणि नागरिक ये-जा करतात, त्याच ठिकाणी हा विषारी कचरा साचल्याने संसर्गजन्य आजारांसह गंभीर आजारांचा संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सफाई कर्मचारी, लहान मुले आणि सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात सापडले आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष संजय शिवाजी राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इंदापूर तहसीलदार यांच्याकडे यासंदर्भात छायाचित्रे व व्हिडिओ पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली. जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट शास्त्राेक्त पद्धतीने न लावता नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीची तातडीने दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती, इंदापूर) यांनी निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना तात्काळ 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयांनाही लेखी सूचना देऊन केलेल्या कारवाईचा अहवाल प्रशासनाकडे तात्काळ सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने केवळ औपचारिक नोटीस देऊन हे प्रकरण दडपून न टाकता प्रत्यक्ष दोषींवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढला नाही आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
