या जन्मोत्सव सप्ताहाची सुरुवात शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी झाली. या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात शास्त्रोक्त विधीपूर्वक महाअभिषेक करण्यात आला व वीण्याचे पूजन करून सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण सप्ताहात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती, ज्यामुळे संपूर्ण परिसराला एका पवित्र व भक्तिमय वातावरणाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सप्ताहाच्या दरम्यान, सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण मंदिरामध्ये विशेष योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. "आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे" असा संदेश देत, उपस्थितांना योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात आले. हा योग वर्ग यशस्वी करण्यासाठी योगगुरू अशोक अनपट, चंद्रकांत देवकर, सायराभाभी आतार आणि मुख्याध्यापक झोळ सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या योग साधनेचा लाभ शहरातील सुमारे ५० योगसाधकांनी घेतला.
शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मुख्य दिवशी श्री स्वामी समर्थ सेवेकरी सर्व महिला वर्गाने एकत्र येत मंदिरात भगवद्गीता पठण केले व श्रीकृष्णाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. सेवेकरी भगत यांनी या सेवेचे नियोजन करून ती पूर्णत्वास नेली. जन्मोत्सवाच्या शुभप्रसंगी ह.भ.प. शेषागर बोबडे महाराज यांचे भावपूर्ण कीर्तन संपन्न झाले, ज्यास पखवाजवादक आणि टाळकरी यांनी उत्तम साथ दिली. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता मोठ्या उत्साहात बालकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
उत्सवाची सांगता रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पारंपरिक गोपाळकाल्याच्या कीर्तनाने झाली. हा संपूर्ण सप्ताह आणि जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक मोहन गोसावी, नानासाहेब गोसावी, पिंटू गोसावी, तसेच कृष्णा ताटे, महादेव चव्हाण, हमीदभाई आतार, भारत बोराटे, अशोक राऊत, नानासाहेब चिंचकर, नाना चिंचकर, अमर लेंडवे, अंकुश शिंदे, ज्ञानबा शिंदे, पळसे काका आणि भारत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव इंदापूर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला.

