कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या सौभाग्यवती सारिका मामी भरणे यांनी ओझरे येथील शहीद स्मारकाला भेट देऊन शहीद वजीर रास्ते यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहीद वजीर रास्ते यांच्यासारख्या हुतात्म्यांमुळेच आपल्या भारतीय सीमा पूर्णपणे सुरक्षित राहिल्या आहेत, अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
अभिवादन सभेमध्ये बोलताना प्रा. कृष्णा ताटे यांनी सांगितले की, कारगिल युद्धात शत्रूसैन्य उंचावर असतानाही डोंगराखालून जोरदार मारा करत अनेक शत्रूंना यमसदनी धाडणारे वजीर रास्ते हे इंदापूर तालुक्याचे भूषण आहेत. जोपर्यंत अशा शौर्यवान नवजवानांचा आदर्श आपल्या देशात आहे, तोपर्यंत पाकिस्तान, बांगलादेश किंवा चीनसारखी राष्ट्रे भारताकडे वाईट नजरेने पाहू शकत नाहीत. इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी शहीद वजीर रास्ते यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी तालुक्यातील सर्व जनता प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी नमूद केले.
शहीद पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेला ३५ स्थानिक नागरिकांनी व युवकांनी रक्तदान करून शहिदांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. यासोबतच ओझरे परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या सोहळ्यात देशसेवा करणाऱ्या शूरवीरांच्या परिवाराचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये वीरमाता बायडाबाई दत्तात्रेय रास्ते, वीरपत्नी सुवर्णाताई लक्ष्मण डोईफोडे आणि वीरपत्नी विजयाताई बोराटे यांचा भावूक वातावरणात सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वीरपिता दत्तात्रेय बनाजी रास्ते यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला जय हिंद आजी-माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण तुकाराम घोगरे, कार्याध्यक्ष तानाजी मोरे, सचिव रविराज पवार, संघटक हनुमंत पारेकर, अशोक इंगळे, जयवंत घाडगे, ज्येष्ठ माजी सैनिक शामराव कांबळे, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे, कॅप्टन लक्ष्मण माने, सोलापूरचे रिटायर नायब सुभेदार सागर पाटील, माजी चेअरमन कैलास शेंडगे, दत्तात्रेय रणदिवे सर, गजेंद्र रास्ते, सोमनाथ रास्ते, पोलीस पाटील दिलीप रास्ते, नितीन रास्ते, सागर रस्ते, किसन गाडेकर, विठ्ठल पवार, विनोद जाधव, भारत पालवे, संजय शिंदे, किरण खटके तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे आणि अमोल परदेशी या सर्व मान्यवरांसह ओझरे ग्रामस्थ व इंदापूर तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.


