पुणे: येथे नुकत्याच पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲबॅकस आणि मेंटल ॲरिथमॅटिक स्पर्धेत प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अरहान सूरज शेख याने घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण, चुरशीच्या आणि वेळेच्या आव्हानात्मक कसोटीवर पार पडलेल्या या स्पर्धेत अरहानने आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या, वेगाच्या आणि गणितातील अचूक एकाग्रतेच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या कौशल्याचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
आपल्या या यशाविषयी मनोगत व्यक्त करताना अरहान म्हणाला, "राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे आई-वडील आणि मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांचे आहे. ॲबॅकसचा नियमित सराव आणि सरावातील अचूकता यामुळेच मला हा टप्पा गाठता आला. भविष्यात गणितात आणखी प्रगती करून शाळेचे नाव मोठे करण्याचा माझा मानस आहे."
अरहानच्या या यशामागे त्याच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. त्याला या स्पर्धेसाठी मुख्याद्यापक श्री. सुधीर भिसेसर, ॲबॅकस शिक्षिका विद्या भागवत आणि श्रद्धा काळे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शिक्षकांनी करून घेतलेला सराव आणि दिलेल्या उपयुक्त टिप्समुळेच त्याला स्पर्धेत आत्मविश्वासाने सादरीकरण करता आले.
अरहानने मिळवलेल्या या भव्य यशाबद्दल प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच पालकांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. या यशामुळे सर्व स्तरातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून अरहानवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
