इंदापूर प्रतिनिधी : श्री. आदित्य राखुंडे
इंदापूर येथील राजेवलीनगर गणेशोत्सव मित्र मंडळ (बी. एस. ग्रुप) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा 'राजेवलीनगरचा राजा'चा २७ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन गणेशचरणी सेवा अर्पण करतात. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून या गणेशोत्सवाकडे पाहिले जाते.
यंदाच्या गणेश उत्सवाचे औचित्य साधून 'राजेवलीनगरच्या राजा'ला आकर्षक असा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. मा. श्री. अमीर उस्मान तांबोळी आणि त्यांच्या सहपरिवाराच्या वतीने ही सेवा अत्यंत भक्तिभावाने गणरायाच्या चरणी समर्पित करण्यात आली आहे. या मुकुटामुळे बाप्पाच्या रूपाला अत्यंत विलोभनीय आणि तेजोमय स्वरूप प्राप्त झाले असून, भाविकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राजेवलीनगरचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सर्व जाती-धर्मांमधील लोकांना एकत्र आणणारा एक सामाजिक मंच बनला आहे. सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि मनोभावे गणरायाची सेवा करतात. आमिर तांबोळी यांनी आपल्या कुटुंबासह दिलेली ही चांदीच्या मुकुटाची भेट हीच या भागातील सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाची खरी ओळख सिद्ध करते.
मंडळाच्या २७ व्या वर्षाच्या यशामागे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि परिसरातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. चालू वर्षीचे मंडळाचे अध्यक्ष सुरज शेंडे आणि उपाध्यक्ष तेजस बनसोडे व सर्व कार्यकर्ते या महोत्सवाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत आहेत. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
गणरायाला चांदीचा मुकुट परिधान केल्यानंतर 'राजेवलीनगरचा राजा'च्या दर्शनासाठी इंदापूर व आसपासच्या परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन श्रींची आरती व पूजन करत असून, राजेवलीनगर मित्र मंडळ (बी. एस. ग्रुप) यांनी जपलेल्या या सामाजिक सलोख्याचे आणि ऐक्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
