इंदापूर: रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील प्रथम क्रमांकाचे मानाचे स्थान पटकावणाऱ्या 'रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल'च्या वतीने यंदाचा प्रतिष्ठित 'सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड २०२६' (SERA 2026) शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टला प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सबलीकरण आणि मोबाईल व्यसनमुक्ती अशा विविध सामाजिक क्षेत्रांत ट्रस्टने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'अल्फा बाईट हॉल, इंदापूर' येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रो. योगेश भिडे (व्होकेशनल डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट ३१३१) उपस्थित होते. तसेच रो. सविता भोर आणि रो. वसंतराव मालुंजकर (इकोनोमी अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट डायरेक्टर) , संस्थापक अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास सन्माननीय पाहुणे म्हणून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुभाषचंद्र कराळे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या अध्यक्षा रो. मंदाकिनी डोंबाळे आणि संचालक मंडळाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.
अध्यक्षा सौ. पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ सालापासून कार्यरत असलेल्या शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने गेली १० वर्षे विविध सामाजिक क्षेत्रांत सातत्याने भरीव कार्य केले आहे. संस्थेच्या 'शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजने'अंतर्गत महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच, ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'शंकरराव पाटील कोपीवरची शाळा' हा अभ्यासवर्ग चालवला जातो आणि अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी 'उन्मेष कौशल्य महोत्सव' आयोजित केला जातो.
आरोग्य क्षेत्रातही संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. स्थलांतरित ऊसतोड मजूर आणि त्यांच्या मुलांसाठी 'शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र' थेट शेतात जाऊन मोफत आरोग्य तपासणी व उपचारांची सोय उपलब्ध करून देते. या उपक्रमाचा आतापर्यंत ४५,००० हून अधिक मजुरांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे.
महिला सबलीकरणासाठी विशेष उपक्रम राबवून गारमेंट मेकिंग व इतर क्षेत्रांत स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात, ज्यातून १५०० पेक्षा जास्त महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे. याशिवाय, वंचित घटकांसाठी 'तालुकास्तरीय बाल साहित्य संमेलन', 'ओजस बालसंस्कार वर्ग', जनजागृती पथनाट्य, पालकत्व शिबिरे, 'अॅनिमिया मुक्त शाळा अभियान', मोबाईल व्यसनमुक्ती कार्यशाळा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या एआय व रोबोटिक्स कार्यशाळा आणि क्रीडारंग स्पर्धा नियमितपणे आयोजित केल्या जातात.
सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील प्रथम क्रमांकाच्या क्लबकडून मिळालेला हा बहुमान संस्थेच्या सामाजिक कार्याला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे यांनी केले. यावेळी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाच्या प्रभावामुळे हा पुरस्कार संस्थेस दिल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन श्री.सागर कांबळे यांनी केले. या प्रसंगी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या संचालक सौ. नायकुडे मॅडम, ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, कार्यकर्ते श्री. महादेव चव्हाण, श्री. भारत बोराटे, श्री. हमीद आत्तार, तसेच संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, अमोल राऊत, केदार गोसावी, स्वाती कोल्हे व वैष्णवी झगडे उपस्थित होते.

