पिंपरी-चिंचवड - प्रतिनिधी: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MCCIA) च्या 'उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास समिती'च्या अध्यक्षपदी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) कार्यकारी संचालक व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव मा. डॉ. गिरीश देसाई यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात समन्वय साधून तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान करण्याच्या दृष्टीने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक वर्तुळातून डॉ. गिरीश देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. गिरीश देसाई यांच्या यशाचा भक्कम पाया त्यांच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेवर उभा आहे. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, 'पीएच.डी.' पदवी प्राप्त केली आहे. तंत्रज्ञान आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या प्रगल्भ अभ्यासामुळेच त्यांना विविध शिक्षण संस्थांचा डोलारा समर्थपणे पेलता आला आहे.
डॉ. देसाई हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) कार्यकारी संचालक म्हणून अत्यंत कुशलतेने धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे आधुनिक केंद्र बनले असून, दरवर्षी २०,००० हून अधिक विद्यार्थी येथे कौशल्यपूर्ण शिक्षण घेत आहेत. याशिवाय, ११३ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या 'नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाला' (NMVPM) शैक्षणिक वारसा आणि नवीन तंत्रज्ञान यांचा सुवर्णमध्य साधत आधुनिक आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
आदरणीय शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणून काम पाहताना डॉ. गिरीश देसाई यांनी शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य या मुख्य क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून वंचित घटकांसाठी महिला सबलीकरण उपक्रम, उसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे, त्यांच्या मुलांसाठी शालेय शिक्षण, तसेच तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहेत.
शिक्षण आणि समाजकारणासोबतच कॉर्पोरेट जगतातही डॉ. देसाई यांच्या अनुभवाचा मोठा प्रभाव आहे. 'Fidel Softech Ltd.' चे स्वतंत्र संचालक म्हणून त्यांनी तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे. नुकताच नवी दिल्ली येथे भारताचे 'सीएसआर जनक' डॉ. भास्कर चॅटर्जी यांच्या उपस्थितीत डॉ. देसाई यांना 'इंडिया सीएसआर इम्पॅक्ट लीडर अवॉर्ड २०२५' (India CSR Impact Leader Award) देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या मागील तीन दशकांच्या समर्पित प्रवासाची पावती मानला जातो.
MCCIA च्या समिती अध्यक्षपदी निवड झाल्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. गिरीश देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर आणि डिजीटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अजित गटे उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. देसाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ. गिरीश देसाई यांनी आभार व्यक्त केले आणि उच्च शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
