इंदापूर: इंदापूर शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि जिव्हाळ्याची समृद्ध परंपरा जपण्याचे प्रतीक आहे. या परंपरेशी वाघ परिवाराचे गेल्या ३६ वर्षांपासून अतूट नाते जोडले गेले आहे. यंदाही कसबा परिसरातील मराठा नवरात्र उत्सव मंडळाच्या उत्सवात वाघ परिवाराची मुख्य उपस्थिती पाहायला मिळाली.
कसबा परिसरातील मराठा नवरात्र उत्सव मंडळाच्या ३६ व्या नवरात्र महोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने सुरुवात झाली. कै. रमेश काका शुक्ल व कै. भगवानकाका शुक्ल यांनी १९९१ मध्ये सुरू केलेल्या या महोत्सवात गेल्या ३६ वर्षांपासून देवीच्या प्रतिष्ठापनेचा आणि पूजनाचा मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाघ परिवाराला दिला जात आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवातही श्री. अरविंद विष्णू वाघ यांनी स्वतः उपस्थित राहून श्री जगदंबेची आरती केली आणि दर्शन घेतले.
काही काळापूर्वी आलेल्या गंभीर आजारपणावर मात करत, कुलदैवत श्री जोतिबा आणि आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने पुन्हा या धार्मिक परंपरेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आरती करण्याचा मान मिळाला, याबद्दल श्री. अरविंद विष्णू वाघ यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली.
मराठा नवरात्र उत्सव मंडळाच्या सर्व अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. उत्सव संपतात, परंतु प्रेमाने आणि आदराने जपलेली ही नाती पिढ्यान्पिढ्या अशीच कायम टिकून राहतात, असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

