इंदापूर: इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला आहे. शहरातील इंदापूर नगर परिषद परिसर आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नगरपरिषद समोरील रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या मुख्य रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असताना अपघाताची टांगती तलवार कायम आहे.
शहरातील नवरात्र निमित्त लावलेल्या स्वागत कमानीवरील फ्लेक्स आणि त्याचे लोखंडी सांगाडे तुटून खाली लोंबत आहेत. समोरून येणाऱ्या बस, ट्रक आणि टेम्पो सारखी उंच वाहनांच्या वरील भागाला ही लोखंडी सांगाडे अडकत आहेत व घासत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेच, परंतु अपघाताचा धोका वाढला आहे.
याच्या पुढेच 50 फुटांवरच खाजगी इंटरनेट पुरवठादार कंपन्यांनी टाकलेल्या केबल्सचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या इमारतीवरून त्या इमारती ओढलेल्या या केबल्स खाली येऊन वाहनांना अडथळा करत आहेत. वायर रस्त्यापासून अवघ्या काही अंतरावर खाली आल्यामुळे बस, ट्रक आणि ट्रॅक्टरसारख्या उंच वाहनांना अडकत आहेत. बस चालक व वाहक यांना हाताने केबल वर करून बस पुढे न्यावी लागत आहे. दुचाकीस्वारांच्या गळ्यात केबल्स अडकून गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सर्वात गजबजलेल्या भागात आणि नगर परिषदेच्या अगदी समोर हा प्रकार घडत असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ हे धोकादायक सांगाडे हटवावेत. तसेच रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल्स चा योग्य तो बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी इंदापूरकरांकडून केली जात आहे.

