इंदापूर: सणासुदीच्या काळात इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत नगरपालिकेकडून अचानक रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. ऐन गर्दीच्या आणि खरेदीच्या दिवसांत सुरू झालेल्या या कामामुळे प्रशासनाच्या नियोजनावर नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून आता तीव्र शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सण-उत्सवांमुळे सध्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. मात्र, रस्त्यांवरील खड्डे आणि सतत उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे बाजारात येणारे ग्राहक, स्थानिक दुकानदार आणि वाहनचालक कमालीचे हैराण झाले आहेत. रस्त्यावरून वाहने जाताच धुळीचे लोटच्या लोट हवेत उडत असल्याने वाहनचालकांना समोरचे रस्ते दिसणेही कठीण झाले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे सणामुळे बाजारपेठेत खरेदीचा उत्साह आणि गर्दी वाढत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या अवेळी सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन गर्दीच्या काळात हे खोदकाम नेमके का काढले, असा सवाल आता प्रत्येक चौक आणि बाजारपेठेत विचारला जात आहे.
शहरातील विकासकामांना किंवा रस्त्यांच्या दुरुस्तीला नागरिकांचा अजिबात विरोध नाही; मात्र सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे योग्य नियोजन करणे ही नगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी नाही का, असा संतप्त सवाल इंदापूर नागरी संघर्ष समितीचे श्री. महादेव चव्हाण सर, श्री. हमीद भाई आत्तार, नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करून रस्ते पूर्ववत करावेत किंवा धूळ बसवण्यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


