कर्तृत्ववेध : गौरवगाथा प्रेरणादायी प्रवासाची
इंदापूर (दि. ०५ ऑगस्ट २०२६): "शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ती समाज परिवर्तनाची अथांग ताकद असते," हे विधान जेव्हा एखादा शिक्षक आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि जीवनकार्यातून सिद्ध करतो, तेव्हा तो केवळ एक मार्गदर्शक राहत नाही; तर संपूर्ण समाजाच्या विकासाचा एक चिरंतन दीपस्तंभ ठरतो. आज आमच्या वृत्तपत्राच्या संपादकीय पानावरून अशाच एका प्रेरणादायी आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा करताना मला एकाच वेळी अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे. आज ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे द्वार उघडणारे आदरणीय तुषार रंजनकर सर यांचा वाढदिवस! मी स्वतः सरांचा एक माजी विद्यार्थी या नात्याने, आज या शुभप्रसंगी त्यांच्या अलौकिक जीवनप्रवासाचा आणि शैक्षणिक क्रांतीचा हा शब्दपट मांडत आहे.
तुषार रंजनकर सरांचा शैक्षणिक प्रवास हा स्वतःच एक मोठा वस्तुपाठ आणि प्रेरणास्रोत आहे. पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी पूर्ण करत असतानाच, त्यांनी 'विद्यार्थी साहाय्यक समिती'च्या 'कमवा आणि शिका' योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. संघर्ष आणि कष्ट यातून जाताना त्यांनी समाजसेवेचे धडे गिरवले. जे कष्ट त्यांनी स्वतः सोसले, त्याची झळ इतर ग्रामीण विद्यार्थ्यांना बसू नये, या ध्यासाने त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची बीजं रुजवली. आज त्याच 'विद्यार्थी साहाय्यक समिती'मध्ये, जिथे त्यांनी एकेकाळी एक गरजू विद्यार्थी म्हणून पाऊल ठेवले होते, तिथे ते कार्यकारी विश्वस्त म्हणून अत्यंत समर्थपणे धुरा सांभाळत आहेत. एका ध्येयवादी विद्यार्थ्याचा कार्यकारी विश्वस्तपदापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ आहे.
१९९० च्या दशकाचा तो काळ आठवला, तर लक्षात येईल की त्यावेळी ग्रामीण भागात संगणक ही संकल्पना दूरचीच, पण साधी ऐकण्यातही नव्हती. तंत्रज्ञान म्हणजे केवळ मोठ्या शहरांची मक्तेदारी मानली जात होती. परंतु, रंजनकर सरांच्या दूरदृष्टीने भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी संगणक क्षेत्रातील अफाट संधी आधीच ओळखल्या. १५ ऑगस्ट १९९३ रोजी त्यांनी इंदापूरमध्ये 'अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स' या महत्त्वाकांक्षी संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील डिजिटल क्रांतीचा पाया रचला. १९९५ साली 'व्यवसाय मार्गदर्शन केंद्र मुंबई' यांची शासन मान्यता व २००२ साली महाराष्ट् ज्ञान महामंडळ यांची मान्यता मिळवून MS-CIT मिळवून त्यांनी हे आधुनिक व महागडे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
"इंदापूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये श्री. तुषार रंजनकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ९० च्या दशकात जेव्हा तंत्रज्ञान ग्रामीण भागापासून दूर होते, अशा वेळी त्यांनी इंदापुरात 'अल्फा बाईट'च्या माध्यमातून संगणक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज 'विद्यार्थी साहाय्यक समिती' व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे सुरू असलेले कार्य इंदापूर शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांना इंदापूरकरांच्या वतीने वाढदिवसाच्या स्नेहमयी शुभेच्छा!- श्री. भरत शहा, नगराध्यक्ष, इंदापूर नगर परिषद
इंदापूर तालुक्यातून सुरू झालेला हा ध्यास हळूहळू इंदापूर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण बनला. केवळ साक्षरतेवर न थांबता, २००५ साली सरांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट् मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून B.Sc. (BIS) आणि BCA यांसारखे उच्च व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम ग्रामीण भागात सुरू केले. आज 'अल्फा बाईट'च्या माध्यमातून ३५ हजारहून अधिक विद्यार्थी संगणक साक्षर होऊन सक्षम झाले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत, तर अनेकांनी स्वतःचे यशस्वी उद्योग-व्यवसाय उभारून रोजगाराच्या नव्या दिशा खुल्या केल्या आहेत.
'अल्फा बाईट' ही केवळ संगणक शिकवणारी संस्था राहिली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित केलेली एक परिवर्तनकारी चळवळ बनली. सरांची ठाम भूमिका होती की, "कोणतेही शिक्षण केवळ व्यावसायिक न राहता ते समाजोन्मुख असावे." याच भूमिकेतून सरांनी 'अल्फा बाईट'च्या माध्यमातून नेतृत्व विकास, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारे उपक्रम राबवले. विशेषतः, 'कमवा आणि शिका' ही अभिनव योजना संस्थेत प्रभावीपणे राबवून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहणार नाही, याची काळजी घेतली. २०१२ साली बँकॉक येथे 'Successful Study Centre of YCMOU' या विषयावर शोधनिबंध सादर करण्याचा मान सरांना मिळाला, ज्यामुळे 'अल्फा बाईट' आज राज्यात 'रोल मॉडेल' ठरली आहे.
"अल्फा बाईट मधील 'कमवा व शिका' योजनेदरम्यान मला स्वच्छतेपासून ते व्यवस्थापनापर्यंतचे धडे मिळाले. तेथूनच माझ्या व्यक्तिमत्त्वाची भक्कम पायाभरणी झाली. आज रांची येथील राजभवनात कार्यरत असताना, अल्फा बाईटमध्ये शिकलेले प्रत्येक कौशल्य आणि गुण मला पावलोपावली उपयोगी पडत आहेत. सरांनी मला जसे घडवले, तसेच हजारो विद्यार्थ्यांना घडवत राहोत! आदरणीय सरांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!"- श्री.निलेश रासकर(माजी विद्यार्थी) राजभवन, रांची
पुणेस्थित 'विद्यार्थी साहाय्यक समिती'चे कार्यकारी विश्वस्त म्हणून रंजनकर सर आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या नेतृत्वाने व सहकाऱ्यांच्या साथींनी समितीतर्फे माफक दरात उत्कृष्ट निवास व भोजन सुविधा, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि अचूक करिअर समुपदेशन उपक्रम अत्यंत पारदर्शकतेने चालवले जातात.
यासोबतच, 'शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर' चे खजिनदार म्हणून त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची नवी व्याख्या तयार केली आहे. संस्थेच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी 'शंकरराव पाटील कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग’, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 'बाल साहित्य संमेलन', ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांसाठी ' शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजना', बालसंस्कार वर्ग आणि महिलांसाठी कौशल्यविकास उपक्रम राबवले जातात.
LAHI मार्फत Junior Rural Fellowship, 'चला बोलूया' उपक्रम, फिरती विज्ञान शोधिका आणि विनाव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती यांसारख्या नावीन्यपूर्ण प्रयोगांमधून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना आशेचा किरण दाखवला आहे. सरांच्या या अतुलनीय आणि प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
आज जेव्हा मी माझ्या स्वतःच्या आणि माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याकडे वळून पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे दिसते जर आम्हाला वेळेवर रंजनकर सरांचे मार्गदर्शन, अल्फा बाईटचा पाठिंबा आणि सरांचा विश्वास मिळाला नसता, तर आम्ही आज आयुष्यात जे काही आहोत, तिथे कदाचित पोहोचू शकलो नसतो. सर केवळ संगणकाचे कोडिंग किंवा तांत्रिक धडे शिकवत नाहीत, तर ते 'माणूस' कसा घडायचा, संकटांशी कसा सामना करायचा आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही समाजाचे देणे कसे फेडायचे, याचे प्रत्यक्ष संस्कार करतात.
तुषार रंजनकर सर म्हणजे शिक्षण, समाजसेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक अलौकिक त्रिवेणी संगम आहेत. त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, ग्रामीण भागातील मुलांमध्येही अफाट क्षमता असते; गरज असते ती फक्त त्यांना योग्य संधी आणि विश्वासाचा हात देण्याची.
आज सरांच्या वाढदिवसाच्या या मंगल प्रसंगी, मी सर्व माजी विद्यार्थी आणि इंदापूरकरांच्या वतीने सरांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सरांनी पेटवलेली ज्ञानाची आणि संस्कारांची ही मशाल अशीच हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत राहील! आदरणीय सरांना वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा!
- श्री. दिपक जगताप (माजी विद्यार्थी)
संपादक

