मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलावर इंदापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणारा एक सिमेंटचा बल्कर अचानक बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. सुरक्षेसाठी या बल्करच्या मागे काही अंतरावर बॅरिकेट्स लावून सूचना देण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी वेगाने आलेल्या एका ट्रकला समोर अचानक बॅरिकेट्स दिसल्याने चालकाने अपघात टाळण्यासाठी जोरात ब्रेक लावला. ट्रकला अचानक लावलेल्या ब्रेकमुळे त्याच्या पाठीमागे असलेल्या दोन चारचाकी कार थेट ट्रकला मागून धडकल्या.
अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. दुखापत झालेल्या प्रवाशांना अजिबात वेळ न दवडता तत्काळ पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासनाकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

