मोशी: येथील प्रियदर्शनी स्कूलचा इयत्ता पाचवीतील चुणचुणीत विद्यार्थी वियान वैभव घसे याने 'ऑल इंडिया ओपन नॅशनल लेव्हल कराटे चॅम्पियनशिप'मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल वियानचे क्रीडा क्षेत्रात आणि सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ही भव्य राष्ट्रीय कराटे स्पर्धा पुण्यातील येरवडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्ये आणि नामांकित संस्थांमधून आलेल्या बाल व तरुण खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत वियानने आपल्या उत्कृष्ट खेळाचे, जिद्दीचे, चपळतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली व कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
कराटे हा केवळ एक क्रीडा प्रकार नसून, त्यात शारीरिक ताकद, मानसिक एकाग्रता, चपळता आणि कठोर शिस्त यांना अत्यंत महत्त्व असते. वियानने आपल्या प्रत्येक मॅचमध्ये या सर्व गुणांचा प्रत्यय दिला. गेल्या काही महिन्यांपासूनचा त्याचा नियमित सराव, अतोनात मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळेच तो राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवू शकला, असे त्याच्या प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.
वियानच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीने वियानचा विशेष सत्कार करण्यात आला व त्याला पुढील उज्ज्वल भविषणासाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रियदर्शनी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीवरच भर न देता क्रीडा व इतर सहशालेय उपक्रमांनाही नेहमी प्रोत्साहन दिले जाते. अशा यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, एकाग्रता आणि स्पर्धात्मक भावना वाढीस लागते. वियानच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात अशीच उत्तुंग कामगिरी करण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही वियानने अशीच चमकदार कामगिरी करून देशपातळीवर शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
